सोलापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन वर्षांपूर्वी पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. घटनेत धनगड समाज असा शब्द आहे, तर महाराष्ट्रात धनगर समाज आहे. धनगड आणि धनगर या शब्दांचा बदलामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे. यावर धनगर आरक्षण कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी आषाढीवारीसाठी येताना धनगर समाजाला आरक्षण देण्याचा आदेश पारित करून यावे, अन्यथा आषाढीवारीची शासकीय पूजा करू देणार नाही. असा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
विशेष अधिवेशन बोलावावे -
विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी पंढरपूर येथे धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते. तसेच 2014 साली बारामती येथे धनगर समाजाचे राज्यस्तरीय उपोषण सुरू होते. त्यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी देखील लेखी आश्वासन देत धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. पण शिवसेनेची सरकार येऊन देखील आजतागायत धनगर समाजाला एससी वर्गात आरक्षण मिळाले नाही. आता शिवसेना सत्तेत आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष अधिवेशन बोलावून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा आदेश पारित करावा. अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीने सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.
अन्यथा मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही -
दरवर्षी प्रमाणे यंदा ही आषाढीवारीला मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. महापूजेला येताना मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षणबाबतचे पत्र आणावे अन्यथा त्यांना सोलापूर विमानतळावरून पंढरपूर येथे जाऊ देणार नाही. तसेच काळे झेंडे दाखवून व घरात निषेधार्थ गुढ्या उभे करून महाविकास आघाडी सरकारचा व तसेच शिवसेनेच निषेध केला जाणार असल्याची माहिती धनगर आरक्षण कृती समितीने दिली आहे.