सोलापूर - सोलापूर शहरातील टाळेबंदीच्या काळात शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
कोरोनातून बरे झालेल्या शिक्षकांना पुन्हा ड्युटी लावण्यात आली असल्यामुळे टाळेबंदीतील इतरांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ज्या शिक्षकांना टाळेबंदीच्या काळात ड्युटी लावली आहे, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात मागील दोन महिन्यांपासून शिक्षक कुटुंब सर्वेक्षणाचे काम करत आहेत. घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण करणाऱ्या काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झालेले शिक्षक हे कोरोनावर मात करून घरी आले आहेत. तरीही शिक्षकांना टाळेबंदीच्या कालावधीत ड्युटी लावण्यात आली आहे. अशा शिक्षकांना ड्युटी लावल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे ज्यांची ड्युटी लावलेली आहे, अशा शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने टाळेबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलिसांच्या मदतीला घेण्यात येणाऱ्या पाचशे शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने शहराध्यक्ष श्याम कदम यांनी महानगर पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.