सोलापूर- कोरोनो संसर्गजन्य रोगामुळे सर्वत्र हाहाकार उडाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील घोटी या गावाने त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी चक्क गावबंदीचा निर्णय घेतला आहे.
घोटी गावात येणाऱ्या केम, साडे, निंभोरे, वरकुटे या चारही रस्त्याच्या शिवेवरती चेक पोस्ट बनविले आहेत. गावातील तरुण गावाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी बंदोबस्त करत आहेत. गावातून अत्यावश्यक काम सोडून कोणीही गावाच्या बाहेर जायचे नाही. तर पुणे, मुंबई व परगावाहून आलेल्या माणसांची तपासणी केल्याशिवाय गावात प्रवेश दिला जात नाही.
अत्यावश्यक सेवेसाठी ज्या गाड्या वापरल्या जात आहेत त्यांना स्टीकर लावले आहेत. तसेच याव्यतिरिक्त जे कोणी गावाच्या बाहेर जात-येत असेल तर, त्यांची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. गावबंदीचा निर्णय आम्ही सर्व घोटी ग्रामस्थांनी मिळून घेतला आहे, अशी माहिती सरपंच सचिन पाटील यांनी दिली आहे.