सोलापूर - शेगावहून 8 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी सोलापूर शहरात आगमन झाले. शहराच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांनी या दिंडीचे स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांना फराळ-प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिला वारकरी आणि नगरसेविकांनी फुगडीवर फेर धरला. त्यात महापौर शोभा बनशेट्टी यांनीही पदर खोचत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
शिस्तबद्ध आणि नेटक्या नियोजनासाठी या दिंडीचा नावलौकीक आहे. पंढरपूरला येणाऱ्या दिंड्यांमध्ये ही दिंडी सर्वांत जास्त अंतर कापते. आज 27 व्या दिवशी ही संत गजानन महाराजांची दिंडी सोलापूर शहरात दाखल झाली. आज आणि उद्या असे दोन दिवस ही दिंडी सोलापूर शहरात विसावा घेणार आहे. ही दिंडी 33 व्या दिवशी पंढरपुर येथे पोहचणार आहे.
या दिडींच्या निमित्ताने शहरातील भाविक मोठ्या श्रद्धेने दिंडी सोहळ्याचे स्वागत करतात. या निमित्ताने शहरातील वातावरण भक्तिमय होऊन जाते.
यावेळी नगरसेवक, अधिकारी आणि पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.