पंढरपूर - स्टॅम्पवर आधारकार्डची छायांकित प्रत व छायाचित्र चिटकावून खोट्या सह्याच्या आधारे, सांगली ते सोलापूर या महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन झालेल्या जमिनीच्या मोबदल्याची, सुमारे ३ कोटी ६० लाख २४ हजार रुपयांची रक्कम हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगोला तालुक्यातील काळूबाळूवाडी (जुनोनी) गावातील ही घटना असून या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकार
काळूबाळूवाडी जुनोनी येथील अंकुश मनोहर कांबळे यांच्या मालकी वहिवाटीची जमीन गट नं. १८० या मिळकतीचे त्यांच्या भावकीतील लोकांमध्ये अद्याप वाटप झालेले नाही. या जमिनीमधून सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ गेलेला असल्याने भूसंपादन झाली आहे. भूसंपादन झालेल्या मोबदल्याची नोटीस त्या गटाशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींना त्यांच्या नावे भूसंपादन मोबदला ३ कोटी ६० लाख २४ हजार १०२ रुपये अशी नमूद करून एकत्रित पाठविल्या होत्या. सदर नोटिशीमध्ये फिर्यादीचे मयत वडील मनोहर कांबळे यांचे नाव देखील नमूद होते.
अशी केली फसवणूक
तानाजी मारुती कांबळे यांनी नोटीस मिळाल्यानंतर स्वतःच्या नावे १०० रुपयांचा स्टॅम्प घेऊन संजय अशोक कांबळे, नवनाथ सोपान कांबळे, सुवर्णा सुधाकर कांबळे, अनिता केशव कांबळे, सदाशिव बापू कांबळे, विठ्ठल दामू कांबळे, कुमार तातोबा कांबळे, शशिकांत मनोहर कांबळे, गोरक्ष सखाराम कांबळे, सर्वजण अंकुश कांबळे यांचा भाऊ नंदकुमार, प्रफुल्ल व आई तुळसाबाई यांच्या घरी येऊन तुम्हाला तुमच्या मोबदल्याची रक्कम द्यायची आहे. त्याकरिता छायाचित्रे, आधार कार्ड प्रती जोडून घेऊन गेले. भावकीतील दहा जणांनी मिळून संगनमताने फसवणूक करण्याच्या हेतूने त्यांच्याकडून घेतलेले छायाचित्रे तानाजी कांबळे यांच्या नावे घेतलेल्या स्टॅम्पवर चिटकावून ते आधारकार्डाच्या छायांकित प्रती जोडून त्या स्टॅम्पवरती जमीन गट नं. १८० मधील रस्त्याकरिता संपादित झालेल्या भूसंपादनाची सुमारे ३ कोटी ६० लाख २४ हजार १०२ रुपये लिहून घेणार तानाजी कांबळे देण्यास हरकत नाही, त्यास आमची सहमती आहे. असा आशयाचा खोटा बनावट मजकूर फसवणूक करण्याच्या हेतूने नमूद केला.
बनावट सह्यांचे कागदपत्र सादर करू रक्कम हडप
स्टॅम्पवरती लिहून घेणार म्हणून फिर्यादीचा भाऊ नंदकुमार, प्रफुल्ल व तुळसाबाई यांची नावे नमूद करून त्यांच्या नावापुढे फोटो चिटाकवून खोट्या सह्या व अंगठे केले. सदर स्टॅम्प सुरुवातीला कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर नमूद केले. त्यावरती कार्यकारी दंडाधिकारी कोळा यांची सही घेवून ओळख म्हणून आमिर अत्तार यांची स्वाक्षरी घेतली. सदरचे घेतलेल्या स्टॅम्पवरील खोट्या सह्या करून फसवणूक करण्याच्या हेतूने अंकुश कांबळे यांची रक्कम हडप करण्याच्या हेतूने प्रातधिकारी भूसंपादन यांच्याकडे देऊन फिर्यादीची परस्पर रक्कम हडप केली.
सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास टाळाटाळ
दरम्यान अंकुश कांबळे यांनी चौकशी केली असता, संपुर्ण प्रकार उघडकीस आला असून संबंधिताना विचारणा केली असता, ते सर्वजण शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत. याबाबत अंकुश कांबळे सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. म्हणून त्यांनी थेट पोलीस अधीक्षक सातपुते यांच्याकडे धाव घेतली. दरम्यान अंकुश कांबळे यांनी वकिलाव्दारे सांगोला न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर लिहून फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा - मोक्षदा एकादशीला भाविक 'बा विठ्ठला'च्या भेटीला; मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन नाहीच...
हेही वाचा - सोलापूर हैदराबाद महामार्गावर कांद्याचा ट्रक लुटणारे पाच दरोडेखोर गजाआड