सोलापूर- जिल्ह्यात पावसाने भीषण अशी परिस्थिती निर्माण केली आहे. पावसाने केलेल्या हाहाकारात मंगळवारपासून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जनावरे दगावले आहेत. या महापुरात जिल्ह्यातील 570 गावे उद्धवस्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
मागील तीन दिवसांपासून सोलापूर शहराला व जिल्ह्यातील तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. शेकडो घरांत पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 4 हजार 865 कुटुंबीयांना जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा व साखर कारखान्यांचा आसरा घ्यावा लागला आहे. नदीकाठच्या 17 हजार नागरिकांना स्थलांतरित करावे लागले आहे.
जिल्ह्यात 8 व्यक्ती पुरात वाहून गेल्या आहेत. जिल्ह्यात वाहतूक बंद झालेल्या रस्त्यांची संख्या 180 आहे. या महापुरात मृत झालेली पशुधनाची संख्या 478 आहे. यामध्ये गाई, म्हशी,शेळ्या, कोंबड्या आदी पशू आहेत. पडझड झालेल्या घरांची संख्या 1 हजार 716 आहे. शेतीपिकांचे नुकसान 34 हजार 788.7 हेक्टर इतके आहे. घरात पाणी शिरलेल्या घरांची संख्या 4 हजार 895 आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
बाधित तालुके आणि गाव संख्या
- बार्शी - 137
- पंढरपूर- 95
- मंगळवेढा- 81
- माढा- 50
- मोहोळ - 41
- अक्कलकोट- 33
- माळशिरस- 32
- सांगोला - 28
- करमाळा- 27
- दक्षिण सोलापूर- 22
- मंद्रुप अप्पर तहसील- 15
- उत्तर सोलापूर- 9
पावसाचा सर्वाधिक फटका बार्शी तालुक्यातील गावांना बसला आहे.