माढा (सोलापूर) - माजी आमदार अॅड. धनाजीराव साठे यांच्या पत्नी मंदाकिनी धनाजीराव साठे याचे मंगळवारी (दि. 16 मार्च) सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 72 वर्षे होते. माढ्यातील महातपूर रस्त्यालगतच्या साठे मळ्यात शोकाकूल वातावरणात मंगळवारी (दि. 16 मार्च) सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साठे यांनी सन 2002 ते 2007 कालावधीत माढा जिल्हा परिषदेचे सदस्यपद भुषवले होते. या काळात त्यांनी विविध विकास कामे मार्गी लावली. प्रलंबित कामे मार्गी लावत तालुक्यातील बहुतांश शाळांच्या वर्गखोल्यांसाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी मिळवून दिला होता. याचबरोबर त्यांनी माढा व परिसरासाठी भरीव असे सामाजिक व विधायक कार्य केल्याने त्यांची कारकीर्द गाजली होती. सोलापूर जिल्ह्याचे सहकारमहर्षी गणपतराव साठे यांच्या स्नूषा तर कााँग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांच्या त्या मातोश्री होत. अंत्यसंस्कारावेळी माढ्याचे माजी खासदार संदीपान थोरात, शिवसेना समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर, भाजपचे राजकुमार पाटील बोरगावकर, कुर्मदास कारखान्याचे उपाध्यक्ष शिरीष पाटील, जलतज्ज्ञ अनिल पाटील, नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांच्यासह नगरसेवक जिल्ह्यातील साठे कुटूंबियाचे नातेवाईक सर्वच क्षेत्रातील मान्यवर शहरवासीय उपस्थित होते.
हेही वाचा - पंढरपूरसह देशातील 14 विधानसभा, 2 लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक 17 एप्रिलला
हेही वाचा - पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर, 17 एप्रिल रोजी होणार मतदान