सोलापूर - भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक व त्यांच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची देणी थकवली आहेत, असा आरोप कारखान्याचे माजी पदाधिकारी, शेतकरी व भीमा बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भीमा कारखान्यात सत्ता बदलानंतर सर्व हंगाम फेल गेले
भीमा सहकारी साखर कारखाना सुधाकर परिचारक, राजन पाटील यांच्या ताब्यात असताना व्यवस्थित सुरू होता. मात्र, निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी वारेमाप आश्वासने दिली. शेतकऱ्यांना कारखाना उत्कृष्ट चालवतो, असे सांगितले होते. सत्ता बदलानंतर एखादा हंगाम वगळता सर्व हंगाम फेल गेल्या आरोपही कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील यांनी केला आहे.
जाब विचारणाऱ्या सभासदांना नोटिसा
कारखान्याच्या विस्तारिकरणासाठी संचालक मंडळाने कर्ज घेतले आहे. पण, ते कर्ज फेडत नसल्याने व्याज वाढत आहे. याबाबत जाब विचारणाऱ्या कारखान्याच्या 500 सभासदांना नोटिसा पाठविल्या आहेत, असा आरोप माजी संचालक शिवाजी चव्हाण यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या रकमा येणे बाकी आहेत
शेतकऱ्यांची 28 कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम येणे आहे. त्यांच्या नावावर आयडीबीआय बँकेतून 32 कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेले ड्रीपचे पैसे बँकेत जमा केले नाहीत. भीमा सहकारी कारखान्यावर आजतागायत दोन वेळा आर.आर.सी.ची कारवाई झाली आहे. कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा पगार 24 महिन्यांपासून थकीत आहेत. साखर आयुक्त, मुख्यमंत्री यांसह अनेक ठिकाणी तक्रारी केल्या असल्याची माहितीही चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हेही वाचा - बार्शीत आमदार राजेंद्र राऊत आणि पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यात खडाजंगी