सोलापूर- महाराष्ट्रात भिवंडी, इचलकरंजी, मालेगाव आणि सोलापूर या प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग उद्योग चालतो. या उद्योगावर जवळजवळ महाराष्ट्रातील आठ लाख कामगारांची उपजीविका अवलंबून आहे. या उद्योगातून फक्त 30 टक्के निर्यात होत असून 30 टक्के कारखानेच चालू आहेत. यामुळे 70 टक्के लोकांना कामापासून वंचित रहावे लागत आहे. कोरोना महामारीने सोलापुरात आणि देशात अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले असून अन्नासाठी आणि औषधासाठी कामगारांची तगमग होत आहे. यात आणखी भर म्हणजे 15 एप्रिलपासून सोलापूरसह महाराष्ट्र राज्यात लागू झालेले कडक निर्बंध. यामुळे यंत्रमाग कामगार भुकेने व्याकूळ झाले आहेत. यांना राज्य शासनाने आपल्या तिजोरीतून 5 हजार रुपयांचे शासकीय अनुदान द्यावे व कारखानदारांकडून 2 हजार रुपये अनामत रक्कम देण्यास भाग पाडावे. अन्यथा अक्षयतृतीया व रमजान ईदच्या दिवशी यंत्रमाग कामगारांना सोबत घेऊन आंदोलनाच्या पवित्र्यात उतरावे लागेल, असा लेखी इशारा कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम उर्फ आडम मास्तर यांनी दिला.
लेखी निवेदन इमेलद्वारे पाठवले
शनिवारी (8 मे) यंत्रमाग कामगारांच्या अनेक प्रलंबित समस्या व मागण्याबाबत शरद पवार, मुखमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव कामगार विभाग, सोलापूरचे पालकमंत्री, कामगार आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सोलापूर महापालिका आयुक्त, सहायाक कामगार आयुक्त आदींना इमेलद्वारे लेखी निवेदन पाठवून दिले.
कोरोनाचे नियम पाळून आंदोलन करणार
नरसय्या आडम यांनी इमेल केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कामगारांना कारखानदारांकडून किमान 2 हजार अनामत न मिळाल्यास कोरोनाचे सर्व नियम पालन करत आंदोलन करणार आहे. याची जबाबदारी शासन, प्रशासन आणि कारखानदारांची राहील. अन्यथा अक्षयतृतीय व रमजान ईदच्या दिवशी यंत्रमाग कामगारांसह आंदोलनाच्या पवित्र्यात उतरावे लागेल.
हेही वाचा - रमजान सणानिमित्त कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलतेसाठी विचार :पालकमंत्री दत्ता भरणे