सोलापूर - सप्टेंबर महिन्यांत शहर व जिल्ह्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने पुराचे मोठे संकट उभे राहिले आहे. माळशिरस तालुक्यात मळोली गावात पुराचे पाणी येऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माळशिरस तालुक्यातील बोंडले-बोडले गावात ओढ्याला आलेल्या पूरामुळे रस्ते आणि काही घरांची पडझड झाली. या पावसात ऊस, द्राक्ष, ज्वारी, कांदा यासह अनेक पिकाचे नुकसान झाले.
पावसामुळे सांगोल्यातील महूद येथील कासाळ ओढा भरुन वाहू लागला आहे. पंढरपूर, माळशिरस, सांगोला तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पडला. या तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद देखील करण्यात आली आहे. करकंब 9 मिमी, पट कुरोली 49 मिमी, भंडीशेगाव 9 मिमी, भाळवणी 62 मिमी, कासेगाव 12 मिमी, पंढरपूर 7 मिमी, तुंगत 1 मिमी, चळे 14 मिमी, पुळूज 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मळोली गावावर महापुराचे संकट आल्याने हाहाकार माजला आहे. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून सतत सहा तास पाऊस पडल्यामुळे मळोली सह शेंडेचिंच, तोंडले-बोंडले, तांदुळवाडी, कोळेगाव, फळवणी, या गावांना महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले. परंतु मळोली गावातील कित्येक घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेक जनावरे वाहून गेली आहेत. मोटरसायकली, जीवनावश्यक वस्तू सर्व काही संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट असतानाच निसर्ग कोपल्यामुळे मळोली गावाला भयंकर अशा मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे.
संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्यामुळे तेथील लोकांचे खाण्यापिण्याची वांदे झाले होते. अशावेळी माळशिरस तालुक्यातील समाजसेवकांनी पूरग्रस्तांना चहापाणी व नाश्त्याची सोय केली. या महापुरामुळे जे लोक बेघर झालेत अशा लोकांना कोण मदत करणार असा प्रश्न जनसामान्यमधून विचारला जात आहे. शासनदरबारी कोण आवाज उठवणार, अशी चर्चा होताना दिसत आहे.