सोलापूर- सातारा येथील सचिन ढमाळ या तरुणासोबत बनावट लग्न लावून त्याची १ लाख रुपये ६० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नानंतर नववधूला घेऊन जाताना एका धाब्यावरती नववधूने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, हा प्रकार समोर आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये नववधू अनु सिकटोलू, दीपा जाधव, लालासो पवार, पूजा उपाध्ये, धनाजी पाटील, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नवरदेव सचिन ढमाळ, मावस भाऊ अंकुश ढमाळ, अलका ढमाळ, चंद्रकांत ढमाळ लालासो पवार असे सर्वजण तवेरा गाडीत बसून साताऱ्याहून 18 फेब्रुवारीच्या सायंकाळी मुलगी पाहण्यासाठी सोलापुरात दाखल झाले. ढवळे यांनी सांगितल्या प्रमाणे ते सर्व मुलगी पसंद पडल्यास लग्नाच्या तयारीनेच आले होते. सोलापुरात येताच घनटेतील आरोपी धनाजी पाटील याच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी ढमाळ कुटुंबीयांना हैदराबाद रोडवरील चंदन काट्याजवळ आणले. तिथे त्याने दोन महिलासह जोत्स्नाची ओळख करून दिली. त्यानंतर एका पत्र्याच्या शेड मध्ये नववधू पूजा रवी पवार(खरे नाव अनु) हिला पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी सचिन ढमाळ याला मुलगी पसंद पडली. त्यानंतर ज्योत्स्ना आणि बिराजदार या दोन्ही महिलांनी लग्नकार्य तत्काळ उरकून टाकण्याचे बोलत त्यासाठी 1 लाख 60 हजार रुपयांची मागणी केली, ढमाळ यांनी देखील तयारी दर्शवत दोन हार आणून बनावट लग्नकार्य उरकून टाकले.
सोलापूर-पुणे महामार्गावरील ढाब्यावरून नववधूने केला पळ काढण्याचा प्रयत्न
सचिन ढमाळ हा लग्न करून आपल्या नातेवाईकांसोबत साताऱ्याकडे कुटुंबासोबत जात होता. त्यावेळी सोलापूर पुणे महामार्गावर नववधूला भूक लागल्याने एका ढाब्यावर सर्वजन थांबले. त्याचवेळी साडी बदलून ड्रेस घालायचा शक्कल लढवत नववधू धाब्याच्या मागील बाजूस गेली. मात्र, काही काळ वाट पाहून देखील ती परत न आल्याने तिचा शोझ सुरू करण्यात आला. थोड्या अंतरावर एका पंम्चरच्या दुकानाच्या पाठीमागे नववधू लपून बसल्याचे आढळून आले. नवरदेव सचिन याने विचारपूस केली असता, तिने त्याच्याकडे आणखीन 1 लाख रुपयांची मागणी करत सोबत येण्यास नकार दिला. त्यावेळी त्याच्यात वाद सुरू झाले.
बनावट लग्नाचे असे फुटले बिंग-
सोलापूर पुणे महामार्गावर सचिन ढमाळ आणि त्याचे नातेवाईक नववधूची समजूत काढत होते, तसेच वादही सुरू होते. हा सर्व प्रकार पाहून महामार्गावरून जाणाऱ्या एका नागरिकांने पोलिसांशी संपर्क करून या गोंधळाची माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण पोलीस दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी सर्वांना तालुका पोलीस ठाण्यात आणून चौकशीस सुरुवात केली. या चौकशी मधून हे लग्नच बनावट झाले असून ढमाळ कुटुबांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा गुन्हा एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणूक, खंडणी बाबतचा गुन्हा दाखल करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.