सोलापूर - उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांचे घर्षण झाल्याने तब्बल 27 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील 10 ते 12 शेतकऱ्यांचे यामध्ये 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे जवळपास 23 एकरातील ऊस आगीपासून वाचवण्यात आले आहे. महावितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे तोडणीस आलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शिरढोण गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातून विद्युत तारा गेल्या आहेत. विद्युत तारा जुन्या असल्याने अनेकदा शॉर्टसर्किट होत असते. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांनी महावितरणकडे तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र वीजवितरण कंपनीने याकडे लक्ष दिलेले नाही. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान जांभूळवन परिसरात विद्युत तारांच्या घर्षणामुळे उसाच्या शेताला आग लागली. यामध्ये 10 ते 11 शेतकऱ्यांच्या 27 एकर क्षेत्रामधील उसाचे नुकसान झाले. तर जवळपास 23 एकरातील ऊस वाचवण्यात आला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
आठ दिवसातील दुसरी घटना...
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी या गावी आठ दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे 27 एकरातील उसाचे नुकसान झाले होते. आता पुन्हा अशीच घटना घडली आहे. त्यामुळे वीजवितरण कंपनीचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. आधीच महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. त्यात वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.