सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मात्र, सोलापूरमध्ये काहींनी दिव्यासोबत फटाकेही वाजवले. फटाक्यांच्या ठिणगीने विमानतळ परिसरातील गवताने पेट घेतला. त्यामुळे विमानतळाच्या आवारात मोठ्या प्रमाणात आग लागली. वाळलेले गवत असल्यामुळे ही आग वाढतच गेली. तब्बल 50 मिनिटे ही आग सुरू होती. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली असून 10 वाजता पूर्ण आग आटोक्यात आली.
9 वाजून 10 मिनिटांनी सोलापूरमध्ये काहींनी फटाके फोडायला सुरुवात केली. विमानतळाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भारतमातानगर आणि परिसरातील लोकांनी देखील फटाके फोडले. या फटाक्यांची ठिणगी विमानतळाच्या परिसरात पडली. त्यामुळे गवताने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केल्याचे चित्र पहायला मिळाले.