पंढरपूर - बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी श्रीहरी शिंदे यांच्या नावाने बँकेमध्ये बनावट कागदपत्र सादर करून ३ लाख रुपये कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज चेअरमन रणजितसिंह बबनराव शिंदे, बँक शाखा अधिकारी यांच्यासह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बार्शी न्यायालयाने दिला आहे. रणजितसिंह शिंदे हे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आहेत.
काय आहे प्रकरण
बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी यांच्याशी संगनमत करून श्रीहरी शिंदे यांच्या ऐवजी तोतया इसमास उभे केले. यात श्रीहरी शिंदे यांच्या बनावट सह्या व बनावट कागदपत्रे तयार करून तीन लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आले. रणजितसिंह बबनराव शिंदे यास जामीनदार राहिले. श्रीहरी शिंदे या शेतकऱ्याचे नावे बनावट कर्जप्रकरण तयार करुन कर्जही जामिनदारालाच दिलेले आहे.
कर्ज न घेता श्रीहरी शिंदे यांना नोटीस
सदर बनावट कर्ज प्रकरणाची शेतकरी श्रीहरी शिंदे यांना कल्पना नव्हती. त्यानंतर सदर कर्ज थकल्यामुळे बँकेकडून श्रीहरी शिंदे यांना तीन लाख 94 हजार रुपयांचे थकीत कर्ज भरण्यासंदर्भात नोटीस आली. यावेळी शिंदे यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता. सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी श्रीहरी शिंदे यांनी कर्ज रकमेविषयी रणजितसिंग शिंदे यांच्याकडे चौकशी केली असता, ते कर्ज घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आठ दिवसात कर्ज भरण्याचे आश्वासन दिले, मात्र कर्जाची रक्कम भरलीच नाही.
कर्ज न मिळाल्यामुळे शिंदे यांच्या मुलींचे नुकसान
सदर बँकेतील कर्ज थकीत असल्यामुळे श्रीहरी शिंदे यांच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी कोणत्याही बँकेत कर्ज मिळू शकले नाही. त्यामुळे शिंदे यांना कर्ज न मिळाल्यामुळे त्यांच्या मुलींचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात श्रीहरी शिंदे यांनी रीतसर तक्रार देऊनही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. तेव्हा शिंदे यांनी अॅड. आर.यु. वैद्य यांच्यामार्फत बार्शी फौजदारी न्यायालयात फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादची दखल घेत बार्शी न्यायालयाने बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्री चेअरमन रणजितसिंह शिंदे, बँकेचे शाखाधिकारी यांच्यासह जणांविरुद्ध ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.