सोलापूर - भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सोलापूर जिल्हा न्यायालयाने जयसिध्देश्वर महास्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांच्यावर कलम 420 नुसार सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - हेल्मेटसक्तीसाठी सोलापूर आरटीओ कार्यालयाकडून आता नवीन फंडा!
जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा या राखीव मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर महाराज यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. त्यानंतर प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे यांनी जयसिद्धेश्वर स्वामींच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत त्यांचा जातीचा दाखला खोटा असल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सांगत तो रद्द केला होता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार अक्कलकोटच्या नायब तहसीलदारांनी सदर बझार पोलीस ठाण्यात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार कलम 420, 467, 468, 471, 34 नुसार सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - सोलापुरात 'कोरोना'चा रुग्ण नाही, अश्विनी रुग्णालयाचा खुलासा