सोलापूर - लॉकडाऊनमध्ये लोकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, यासाठी सोलापूर पोलिसांनी नाकाबंदी आणखी कडक केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापुरात पुन्हा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पोलीस, मनपा कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणी बाहेर आल्यास त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी दिवसभरात सोलापूरातील सातही पोलीस ठाण्याअंतर्गत 957 वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 234 वाहनांवर कारवाई करण्यात आली. 25 वाहन धारकांवर विना मास्क प्रवास केला म्हणून कारवाई करण्यात आली.
जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी नाकाबंदी आणखी कडक केली आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरून पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन जेलरोड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी केले.
सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकीवरुन दोघांनी प्रवास करणे, तीन-चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरू ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबाबत 6 ते 20 जुलै 2020 दरम्यान अनेक नागरिकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाने 35 हजार 650 प्रकरणात 58 लाख 26 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयांनी 9 हजार 823 प्रकरणात 14 लाख 38 हजार 400 रुपयांचा तर नगरपालिका प्रशासनाकडून 3 हजार 272 प्रकरणात 4 लाख 42 हजार 580 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मास्क न वापरणाऱ्या 10 हजार 226 जणांकडून 10 लाख 52 हजार 580 रूपयांचा दंड वसूल झाला आहे. दुचाकीवर दोघांनी प्रवास केलेल्या 787 जणांकडून 3 लाख 57 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यासह सोलापूर शहरात प्रत्येक चेक नाक्यावर 60 ते 70 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत विशेष पोलीस अधिकारी व प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱयांची फौज तैनात करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी शहरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कन्ना चौक, बाशा पेठ, बेगम पेठ, अक्कलकोट रोड, पाणी टाकी आदी भागात कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली.
जिल्ह्यात एकूण 77 लाखांचा दंड वसूल -
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून 77 लाख 7 हजार 480 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये सर्वात जास्त 10 लाख 52 हजार 580 रूपये हे मास्क न वापरणाऱ्यांकडून वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मास्क न वापरणाऱयांची संख्या बघता, प्रत्येक नागरिकानी मास्क वापरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.