सोलापूर - वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रिक्त पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. प्रथम वर्ग आणि द्वितीय वर्ग पदे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जातील. अधिष्ठाता स्तरावरील भरावयाच्या पदांसाठी लवकरात लवकर प्रक्रिया सुरु करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना दिल्या.
वैद्यकीय परीक्षा कोविड नियमांचे पालन करून घेण्याची तयारी सुरू -
वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. अधिष्ठाता स्तरावर पदे भरण्यात येतील. अन्य पदे परीक्षा घेऊन तसेच एमपीएससीमार्फत भरली जातील. लॉकडाऊनमुळे वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. आता या परीक्षा कोविड नियमांचे पालन करून घेण्याची तयारी करण्यात येत आहे, असे यावेळी देशमुख यांनी सांगितले.
शासकीय डॉक्टरांसोबत केली चर्चा -
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी सोलापूर दौरा केला. कोरोना संबंधित विषयावर त्यांनी सोलापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच सोलापूर येथील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय डॉक्टरांसोबत देखील चर्चा केली. यावेळी डॉ. ठाकूर यांनी सादरीकरण केले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना महामारी संबंधीत प्रश्नावर आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. पुष्पा अगरवाल, डॉ. रोहन खैराटकर आदी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे देखील उपस्थित होते. ते सोलापूर येथून उस्मानाबादकडे रवाना झाले.
सोलापूर सिव्हीलमध्ये 100 बेड लहान मुलांसाठी आरक्षित -
लहान मुलांना कोविड उपचारासाठी शासकीय रुग्णालयातील 100 बेड आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये 256 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. सोलापुरातील खासगी रुग्णालयांमध्ये देखील लहान मुलांवर उपचाराची सोय केली जाणार असल्याची माहिती नामदार देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - माता तू वैरिणी! स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करणाऱ्या आईवर गुन्हा दाखल