सोलापूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी बँकामध्ये चकरा मारायची गरज नाही. खरीप हंगामातील पीक कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक शेतकरी हे कर्ज मिळत नसल्याची तक्रार करत होते. मात्र, आता या नवीन ऑनलाईन पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा मिळणार असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्काळ उपलब्ध व्हावे, यासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव असा प्रयोग राबविण्यात आला आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने पीक कर्ज मागणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रथमत अशा पद्धतीने ऑनलाईन पीक कर्जासाठी अर्ज सादर करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नवीन सुविधेमुळे अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर एखादी बँक त्या शेतकऱ्याला कर्ज नाकारत असेल तर त्याचे कारण देखील स्पष्ट करावे लागणार आहे.
शेतकऱ्याने ऑनलाइन पद्धतीने सादर केलेला अर्ज हा जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकाकडे येईल. त्यानंतर त्यांनी जी जवळची बँक कर्जासाठी अर्जामध्ये नमूद केली आहे. त्या बँकेला ऑनलाईन पद्धतीने आलेले अर्ज पाठविण्यात येतील आणि नंतर कर्ज वाटप केले जाईल, अशी प्रक्रिया आहे.
बँकेकडे जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापक यांनी पाठवलेल्या अर्जावर निर्णय घेणे हे बंधनकारक आहे. एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्ज नाकारत असतील तर बँकेने तसं कारण देऊन त्यांचा अर्ज नामंजूर करावा लागणार आहे. आतापर्यंत अनेक बँका या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करत होत्या. मात्र, आता या नवीन पद्धतीमुळे बँकांना कर्ज वाटप करणे, बंधनकारक करण्यात आले आहे.