माढा (सोलापूर) : शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नका. तसेच तोडलेल्या डिपीचे कनेक्शन जोडण्यात यावे, या मागण्यांसाठी मानेगाव मधील महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. तर शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे महावितरण नरमले. वीज कनेक्शन सुरळीत झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
शेतकऱ्यांचा महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा
शिवसेनेचे मुन्ना साठे, प्रहार शेतकरी संघटनेचे पंडित साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वजित पाटील, बालाजी नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली मानेगाव, कापसेवाडीसह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या समवेत हालगीनाद करत महावितरणाच्या कार्यालयावर काल (24 ऑगस्ट) धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या धरणे आंदोलन केले. यावेळी वीज बील वसुली थांबवून वीज पुरवठा सुरु झाल्याशिवाय कार्यालयासमोरुन उठणार नसल्याचा निर्धार करण्यात आला. तसेच, वीज कनेक्शन तोडल्यामुळे होत असलेल्या नुकसानीचा पाढाच आंदोलकांनी वाचला.
वीज कनेक्शन जोडल्यानंतर आंदोलन शांत
तर, वीज कनेक्शन सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वीज कनेक्शन सुरु झाल्याने मानेगाव, कापसेवाडी परिसरातील गावातील शेतकरी शांत झाले. यावेळी शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा - नारायण राणेंना अनिल परबांच्या दबावामुळे अटक? व्हिडिओ व्हायरल