सोलापूर - कांद्यावरील निर्यातबंदी हटवत केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 1 जानेवारीपासून निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय लागू झाला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला होता, परंतु सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.
हेही वाचा - अधिकारी असल्याची थाप मारुन केले लग्न, एक अटकेत
कांद्याचे भाव वाढण्याऐवजी प्रति क्विंटल कमी होत चालले आहे. बाहेर देशातील व्यापारी ताबडतोब मागणी करत नसल्याने ही घसरण होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सरकारचे कांदा विषयक धोरण -
दिवाळी अगोदरच्या कालावधीत कांद्याचे आवाक्याबाहेर जाणारे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यातबंदी सोबत व्यापाऱ्यांवर निर्बंध आणले होते. 14 सप्टेंबर रोजी सरकारने कांदा निर्यातबंदी केली होती. तसेच, कांद्याच्या साठवणुकीबाबत व्यापाऱ्यांवर अनेक निर्बंध आणि मर्यादा घातली होती. कांदा निर्यातबंदी आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे दर घसरले होते. अखेर तीन महिन्यांनी कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे.
निर्णयामुळे भाववाढ अपेक्षित, मात्र शेतकऱ्यांचा हिरमोड
निर्यातबंदीचा निर्णय 1 जानेवारीपासून सरकारने मागे घेतला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना आता परदेशात कांदा पाठवण्याची परवानगी मिळाली आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकरी हे भाववाढ मिळेल, अशी अपेक्षा करत सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीत कांदे घेऊन येत आहेत. कांदा 5 हजार रुपये प्रति क्विंटल विकला जाईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, उत्तम दर्जाच्या कांद्याला फक्त 2 हजार 900 रुपये प्रति क्विंटलपर्यंतच भाव मिळत आहे.
1000 रुपये ते 2900 रुपये भाव -
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उस्मानाबाद, बीड, तुळजापूर, बार्शी, नळदुर्ग आदी भागातील शेतकरी हे कांदा विक्रीसाठी दाखल होत आहेत. मात्र, मार्केट यार्डात कांद्याला 1 हजार ते 2 हजार 900 रुपये असा भाव मिळत आहे. त्यामध्ये आणखीन हमाली, ट्रान्सपोर्ट याची रक्कम वजा केली असता 700 ते 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अशी रक्कम हातात येत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.
दररोज दोन हजार टन कांदा सोलापूर मार्केट यार्डात दाखल
सोलापूर मार्केट यार्डात दररोज 200 ते 225 ट्रक कांदा दाखल होत आहे. जवळपास दोन हजार टन कांदा विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. कांद्याची अवाक अधिक झाल्याने भाववाढ होत नाही. अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
साठेबाजीचा देखील परिणाम
जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांनी कांद्याची साठेबाजी केली आहे. ही साठेबाजी अत्यंत छुप्या पद्धतीने झाली आहे. शहरातील मार्केट यार्डात जवळपास 500 कांदा व्यापारी आहेत. आणि 250 गाळे धारक व्यापारी आहेत.
हेही वाचा - बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करणाऱ्यावर कारवाई