सोलापूर - भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी दुपारच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील वाघोली येथे शेतात नदीपत्रातील इलेक्ट्रिक मोटार काढण्यासाठी नदीत उतरलेला एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. संतोष विष्णु पाटोळे (45) असे वाहुन गेलेल्या या शेतकऱ्याचे नाव आहे.
पावसाच्या जोरामुळे जिल्ह्यातील धरणं भरली असून काही धरणांच्या पाण्याचा विसर्ग नदीत सुरु आहे. वीर आणि उजनी धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात सुरू आहे. तर, वीर धरणातून भीमा नदीच्या पात्रात 1 लाख क्यूसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर भीमा नदीला उजनी धरणातून 25 हजार क्यूसेक्सने पाणी सोडले आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आपल्या शेतातील मोटर वाहून जावु नये म्हणून वाघोली येथील शेतकरी संतोष पाटोळे मोटर काढण्यासाठी गेले होते. यावेळी ते नदी पात्रात उतरले असता पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले.
जिल्हा प्रशासनाने रविवारीच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यातच सोमवारी एक शेतकरी वाहून गेल्यामुळे नदीकाठच्या भागात खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिक तरुण बोटींचा वापर करून नदीपात्राच्या दोन्ही बाजूने पाटोळे यांचा शोध घेत आहेत.