सोलापूर - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना माढा तालुक्यात घडली आहे. महादेव आप्पाराव उबाळे (वय ५२) असे या शेतकऱ्याचे नाव असून दारफळ (सिना) गावातील रहिवासी आहेत. सोमवारी सायंकाळच्या त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड झाले.
महादेव उबाळे यांची दारफळ (सिना) शिवारात ३ एकर शेती आहे. पाण्याअभावी जमिनीतून उत्पन निघत नसल्याने ते नेहमी चिंतेत होते. बँका आणि फायनान्स कंपन्याकडून कर्ज उचलून शेती करत असताना शेतातून उत्पन्नच निघत नसल्याने महादेव उबाळे नैराश्येच्या गर्तेत गेले. मागील ६ महिन्यापासून ते कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेनेग्रस्त होते. यातून त्यांनी सोमवारी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली.
महादेव उबाळे यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना नातेवाईकांनी माढा ग्रामीण रुग्णालयात महादेव याना आणले असता वैद्यकिय अधिकारी यानी त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यु झाल्याचे स्पष्ट केले. वारकरी संप्रदायात असलेले उबाळे यानी जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होते आहे.
महादेव उबाळे यानी शेतातील उपन्न मिळत नसल्याने शेतीसोबतच खवा तयार करण्याचा उद्योग उभारला होता. त्यासाठी बॅकेतुन कर्ज देखील घेतले होते. दरम्यान, या व्यावसायाने देखील महादेव यांना तारले नाही. खव्याच्या व्यवसायाने पदरी तोटाच दिल्याने महादेव हे आणखी नैराश्येत अडकले गेले.
कलेक्टरच्या नावांने चिठ्ठी लिहली-
आत्महत्या करताना महादेव उबाळे यांनी खिश्यात चिट्टी लिहून ठेवली. कलेक्टर यांच्या नावाने लिहलेल्या या चिठ्ठीत महादेव उबाळे यांनी कलेक्टरकडे मदतीची विनविनी केली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळुन तसेच घर खर्च चालवणे जमेनासे झाले म्हणून मी आत्महत्या करीत आहे, असे त्यांनी चिठ्ठीत लिहलेले आहे. युनायटेड बॅक सोलापुर, बंधन बॅक माढा, बार्शी येथील फायनान्स कंपन्या, मर्चट बॅक कुर्डूवाडी, डि.सी.सी बॅकेच्या शाखाचे त्यांनी कर्ज घेऊन शेती व्यवसायामध्ये गुंतवले. मात्र, शेतीत नुकसान येत राहीले. म्हणून मी आत्महत्या करीत आहे. मला कर्ज मुक्त करुन माझ्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळवुन देण्याची कृपा करण्याची विनंती मृतक उबाळे यांनी चिठ्ठीमध्ये केलेली आहे.