बीड : बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांनी (Suresh Dhas) आजपासून प्रचाराला सुरुवात केली. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी महायुतीमध्ये सामील असणाऱ्या राष्ट्रवादीवर धस यांनी निशाणा साधला.
‘दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत' : "आष्टी मतदारसंघात घडाळ्याचे बारा वाजलेत. छोट्या पवारांचे काहीच चालत नाही. मात्र मोठ्या पवारांचे चालते. माझं महायुतीकडून तिकीट जाहीर झालं असतानादेखील घड्याळाचा एबी फॉर्म आला कसा?" असा सवाल धस यांनी उपस्थित करत केवळ मला रोखण्यासाठी हे सुरू असल्याचं म्हटलंय. माझी लढत मात्र शिट्टीशी आहे, असं धस यांनी म्हटलंय.
आष्टी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत : आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला भाजपा आणि राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत म्हटली जात होती. मात्र, निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर धस यांच्याकडून राष्ट्रवादीला लक्ष्य केलं जात आहे. भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळं आष्टी विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपा, राष्ट्रवादी , राष्ट्रवादी (शरद पवार) आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे अशी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत जोरदार लढत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महायुतीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा यांचा समावेश आहे. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 288 मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीवरच राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे) पक्षाचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.
हेही वाचा -
- भारत जोडोच्या नावाखाली समाजात अराजकता पसरवण्याचं काम- देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप
- विधानसभा निवडणूक 2024 : भाजपाचा 'राजपुत्रा'ला नाही, तर या नेत्याला पाठिंबा: अमित ठाकरेंची वाढली धाकधूक
- विधानसभा निवडणूक 2024 : पृथ्वीराज चव्हाणांच्या मैदानात अमित शाह करणार 'बॅटींग'; अरविंद केजरीवाल देणार उत्तर?