सोलापूर- जिल्ह्यासह राज्यातील कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनची नियमावली देखील शिथिल केली आहे. पण दुसऱ्या लाटेत डॉक्टर, फार्मासिस्ट यांवर भयंकर असा ताण पडला होता. कोरोना संसर्गजन्य महामारीनंतर तिसरी लाट येणार अशी दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण ही लाट कधी येणार याचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र, वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.
रोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक
याबाबत डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढतात. उन्हाळा संपल्यावर वातावरणात जबरदस्त बदल होत पावसाळा सुरू होतो. आणि या काळात सर्दी, खोकला, ताप असे आजार होतात. यालाच तिसरी लाट म्हणावे, की काय हा मोठा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतदेखील अनेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याविना सर्दी खोकला आणि ताप याचे औषध घेऊन बरे झालेले आहेत. हे छुपे रुग्ण तिसऱ्या लाटेत बाहेर पडतील आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा फायदाच झाला;अनेक रुग्णांचे जीव वाचले
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील फुफुस रोग तज्ञांना रेमडेसिविर इंजेक्शनचा चांगला अनुभव आला आहे. कोरोना विषाणूवर अचूक औषध आले नाही हे खरे आहे. मात्र, रेमडेसिविर इंजेक्शनमुळे अनेक रुग्णांचे प्राणदेखील वाचले असल्याची माहिती छाती रोग आणि फुफ्फुसरोग तज्ञ डॉ फिरोज सय्यद यांनी सांगितली. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत सोलापुरातील अनेक डॉक्टरांना याची लागण झाली होती. पण वेळेत उपचार मिळाल्याने त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. पण दुसरी लाट ही भयंकर होती. यामध्ये 25 ते 345 वयोगटातील तरुणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. अनेक तरुणांना दुसऱ्या लाटेत आपला जीव गमवावा लागला आहे.
या औषधांचा अधिक वापर झाला
मार्च (2021) महिना अखेरीस कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर जबरदस्त ताण निर्माण झाला. बघता बघता रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. सर्व बाजूने हाहाकार माजला होता. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक एकच धावपळ करत होते. तसेच स्टिरॉईड, अँटी कोगलेशन(रक्त पातळ होण्यासाठी),हिपॅरिन, इनोक्सिपरिन आदी औषध खरेदीसाठी जवळच्या मेडिकल स्टोर मध्ये रुग्णांची गर्दी देखील वाढली होती. अखेर जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठ्याची जबाबदारी स्वतःवर घेत गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्न केला. पण स्टिरॉईड, फॅबीफल्यू,हिपॅरिन यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मेडिकल स्टोर मध्ये जावेच लागले.
तुटवडा झाल्याने काही औषधांच्या किंमती देखील वाढल्या
एका मेडिकल दुकांधारकाने दिलेल्या माहितीनुसार हँड ग्लोजच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. एमआरपी वाढल्या नसून होलसेल दुकानदाराला ज्यादा दराने हँड ग्लोज प्राप्त झाल्याने हँड ग्लोज ज्यादा दराने खरेदी करावे लागले. तसेच पहिल्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत जवळपास 800 ते 900 रुपयांपर्यंत होती ती दुसऱ्या लाटेत 1500 रुपयांपासून ते 2400 रुपयांपर्यंत गेली. यामुळे रुग्णांना अधिक रक्कम मोजावी लागली. अतिदक्षता विभागात मेरोपेनम यासारखे इंजेक्शन सर्रास दिले जातात. याच्या देखील किंमतीत वाढ झाली.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा चिट्टीविना उपचार करणे धोकादायक
अनेक रुग्ण हे सेल्फ मेडिकेशन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय सर्दी, खोकला आणि ताप याचे औषध खरेदीकरून स्वतःच स्वतःवर उपचार करतात. पण हे अतिशय धोकादायक असल्याचे मत सोलापुरातील मेडिकल दुकांनधारक आणि तज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहेत. कारण कोणतेही आजार अंगावर काढणे धोकादायक किंवा जीवावर बेतू शकतो. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून तपासून घेणे गरजेचे आहे. सोलापुरातील औषध निरीक्षक आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाने सक्त आदेश काढून डॉक्टरांच्या चिट्टीविना औषध देऊ नका असा आदेश काढला आहे. व हा आदेश मोडणाऱ्या मेडिकल दुकानधारकांविरोधात कडक कारवाई केली जात आहे.