सोलापूर - पंढरीचा वारकरीI वारी न चुकू दे हरीI ही ठाम भूमिका घेऊन शेकडो वर्षापासून पंढरीची वारी अविरतपणे सुरू आहे. पंढरीच्या पांडुरगाच्या प्रमुख चार वाऱ्यापैकी असलेल्या एक असलेली चैत्री वारी या वर्षी भरणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्री वारीचा सोहळा रद्द करण्यात आलेला असून या वर्षीची चैत्री वारी चुकणार आहे. असे असले तरी वारकऱ्यांनी घरातच बसून वारकरी संप्रदायात सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी पारायण करावे, असे आवाहन वारकरी सांप्रदायिक पाईक मंडळीच्या महाराजांनी केले आहे.
शेकडो वर्षाची परंपरा असलेला पंढरपुरातील पाडुरंगाचा चैत्री वारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय पंढरपुरातील महाराज मंडळींनी घेतला आहे. पंढरपुरात चार प्रमुख वाऱ्या भरतात. यापैकीच एक असलेल्या चैत्री वारीचा सोहळा 4 एप्रिल रोजी होणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लावण्यात आलेली असल्यामुळे चैत्री वारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात २१ दिवस संचारबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातही त्या अगोदरच संचारबंदीचा आदेश काढला आहे. या दरम्यान वारकरी संप्रदायातील महत्त्वाच्या चार यात्रा पैकी असणारी चैत्र शुद्ध एकादशी ची यात्रा येत आहे. गेले काही दिवसांपूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांच्या एकत्र येण्याने संसर्ग पसरु नये, म्हणून दर्शन बंद करण्यात आलेले आहे.
या पार्श्वभूमीवर पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरि।। ही आपली ठाम भूमिका असूनही या देशावर मानवजातीवर हे कोरोनारुपी संकट आलेले असून जनसंपर्क हे त्या रोगप्रसाराचे मुख्य माध्यम आहे. हा जनसंपर्क रोखण्यासाठी लोकांचे एकत्रित येणे टाळले पाहिजे अशा प्रशासनाच्या सुचना आहेत. वारकरी संप्रदाय हा सकल मानवकल्याणाचा विचार मांडणारा संप्रदाय आहे, तरी आपल्या कोणत्याही कृत्याने स्वतः च्या व दुसऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, याची खबरदारी म्हणून सध्या महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या वारकरी संप्रदाईक बंधूना भगिनींना विनंती करण्यात येत आहे, की या चैत्र शुद्ध वारीकरिता पंढरपूरच्या दिशेने कोणीही दिंडीचे प्रस्थान करु नये, अथवा वैयक्तिकरित्यादेखील पंढरपूरकडे येण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपणा सर्वांची वारी पंढरपूर मुक्कामी असणारी सर्व फडपरंपरा मालक, दिंडी मालक, मठाधिपती हे पंढरीरायाच्या चरणी रुजू करतील. हा कठीण काळ थोड्या दिवसांकरीता आहे. आपण सर्वांनी आपापल्या ठिकाणी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ।।ठायीच बैसोनी करा एकचित्त।आवडी अनंत आळवावा।। या संतवचनांवर विश्वास ठेवून श्री पंढरीरायाचे, श्री संत ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांचे नामस्मरण घरी बसूनच करावे हि कळकळीची विनंती करीत असल्याचेही महाराज मंडळीने म्हटले आहे.