पंढरपूर - भांडणाची तक्रार पोलिसात देण्यासाठी जाणाऱ्या तक्रारदार आणि त्याच्या मुलावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. यात तक्रारदाराचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे घडली. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश ऊर्फ बाळ हरी पवार व त्याचे आई-वडील शेतातील घरात होते. त्यावेळी आरोपी लाला बबन शिंदे (रा. बाभुळगाव) हा तिथे आला. त्याने २०१६ साली दिलेल्या तक्रारीच्या कारणावरून सतीशचे वडील हरी पवार यांच्याशी वाद घातला. तसेच त्याने तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळ करत मारहाण केली. मुलगा सतीश याला दगड फेकून मारले. यामुळे सतीशच्या उजव्या हाताच्या खांद्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली.
या भांडणाची तक्रार देण्यासाठी सतीश आणि त्याचे वडील हरी पवार पंढरपूरला निघाले. तेव्हा देगावच्या शिवारात लाला शिंदे याने त्यांची मोटरसायकल अडवली आणि धारदार कोयत्याने हरी पवार यांच्यावर वार केले. यानंतर त्याने सतीशच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात हरी पवार जागीच ठार झाले. तर सतीश गंभीर जखमी झाला. सतीशने या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमधे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी लाला शिंदेला अटक केली आहे.
हेही वाचा - सातव्या वेतन आयोगासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाच्या परीक्षांवर बहिष्कार
हेही वाचा - नणंदेच्या पतीला जेलमधून सोडवण्यासाठी ३ लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा छळ व गर्भपात