सोलापूर - शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुमठे गावातील शिवारातील उजाड शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मागील 5 दिवसांपासून हा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. मधू बाबू साने (वय 34) असे मृताचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली आहे, हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे.
मधू बाबू साने हा बंगळुरू येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. मागील 30 तारखेला तो गुटूंर येथे सासरवाडीला गेला होता. सासूरवाडीतून तो गायब झाल्याची तक्रार गुटूंर शहर पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे. मधू बाबू साने हा हरवला असल्याची तक्रार गुटूंर पोलिसात दाखल झालेली असताना त्याचा मृतदेह एका उजाड शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला आहे. हा मृतदेह 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाडाला लटकलेल्या अवस्थेतच होता.
हेही वाचा - सत्तेची लालसा असती तर कधीच पक्ष सोडला असता - प्रणिती शिंदे
ज्या ठिकाणी मृतदेह सापडला आहे, ती जागा वनखात्याची आहे. वनखात्याची जागा असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी जात नाही. आज सकाळी पोलीस मुख्यालयाला फोन करून कळविण्यात आल्यानंतर झाडाला लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह मिळाला. या मृतदेहा जवळ असलेल्या बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रावरून आणि आधारकार्डवरून हा मृतदेह मधू बाबू साने यांचा असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा नंबर लावून त्यांना कळवण्यात आले. मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असून तो सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - आदिनाथ कारखान्याच्या पाच संचालकांचा राजीनामा; रश्मी बागल यांना मोठा धक्का