पंढरपूर - शहर व तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत किराणा दुकाने आणि इतर काही दुकानांना सूट देण्यात आली होती. त्याचा गैरफायदा घेत अनेकजण विनाकारण फिरताना दिसून येत होते. यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने वगळून इतर दुकाने सकाळी 7 ते 11 यावेळेतच चालू राहतील, असा आदेश दिले आहे. पंढरपूर शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दुकाने चालू राहणार असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकार यांनी दिले आहे.
पंढरपूर शहरात या सेवा चालू राहणार -
पंढरपूर शहरातील किराणा दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, अन्नपदार्थाची दुकाने, चिकन, मटण, कोंबड्या, मासे, अंडी यासारखी विक्रीची दुकाने, शेतमाल, पाळीव प्राण्यांचे पशुखाद्य ही दुकाने आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत चालू राहतील. घरपोच सेवा मात्र सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत चालू राहतील असे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना नियमांचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा -
पंढरपूर शहर व तालुक्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांनी एका ठिकाणी गर्दी न करता घोरोघरी जाऊन भाजी व फळे विक्री करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अधिकारी मनोरकार यांनी केले. कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.