सोलापूर - मुळेगाव तांडा येथे काँग्रेसच्या वतीने बंजारा समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सभेसाठी तयार केलेले स्टेज डळमळीत झाले. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना खाली बसूनच सभा घ्यावी लागली. बंजारा समाजाच्या मेळाव्यात मुळेगाव तांडा येथील काँग्रेसच्या सभेच्या ठिकाणी.
शहरापासून जवळ मुळेगाव तांडा या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बंजारा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळावा सुरू झाल्यावर चव्हाण आणि शिंदे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मेळाव्याच्या स्टेजवर चढले. यानंतर स्टेजवर गर्दी वाढली आणि स्टेज डळमळले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शिंदे आणि चव्हाण यांनी तात्काळ स्टेजच्या खाली उतरून खाली बसूनच सभा घेण्याचा निर्णय घेतला.
मुळेगाव तांडा या ठिकाणी बंजारा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच बंजारा समाजाचा मेळावा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला चव्हाणस आणि शिंदे यांच्यासह माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रमुख नेत्यांसोबतच स्थानिक पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याचे स्टेज लहान आणि बसणाऱ्याची संख्या जास्त झाल्यामुळे स्टेज हलायला लागले. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे पदाधिकाऱ्यांना स्टेजवर येऊ नका असे समजावत होते. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शिंदे आणि चव्हाण यांनी तात्काळ स्टेजवरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. स्टेज डळमळल्यामुळे या नेत्यांनी स्टेजच्या खाली बसूनच सभा पार पाडली.