सोलापूर - विठुरायाच्या दर्शनासाठी पालख्या पंढरीकडे निघण्यास काहीच दिवसांत सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालखी मार्गावर आवश्यक तेथे टँकरची सोय आणि विहीर अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विजय देशमुख यांनी आषाढी वारी सोहळा नियोजनाच्या बैठकीत दिली.
आषाढी वारी 2019 च्या नियोजनासाठी पंढरपुरातील तुकाराम भवन येथे जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी आणि मानाच्या पालख्यांचे विश्वस्त यांची बैठक झाली. या बैठकीस आमदार गणपतराव देशमुख, भारत भालके, प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथमहाराज औसेकर उपस्थित होते.
आषाढी वारी सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालये, अखंडीत वीज पुरवठा, सुरक्षा या बाबींना प्राधान्य द्यावे. पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे, दुरुस्ती, पालखी मुक्कामाची आणि विसावा ठिकाणांची कामे करण्याबरोबरच पालखी विश्वस्तांनी सुचवलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.