माढा - सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायतीच्या प्रशासक म्हणून माढ्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. तसा आदेश देखील नगरपंचायतीला प्राप्त झाला आहे.
माढा नगरपंचायतीची ८ मे रोजी मुदत संपली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या नगरपंचायती आणि नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्तीचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत. माढा ग्रामपंचायतीचे ११ सप्टेंबर २०१५ रोजी नगरपंचायतमध्ये रुंपातर झाले. पहील्या निवडणुकीत साठे गटाने नगरपंचायतीवर बहुमताचा झेंडा फडकावला होता. माढ्यात दादासाहेब साठे, झुंजार भांगे, राजेंद्र चवरे, आनंद कानडे या 4 राजकीय गटात शहराची निवडणूक पार पडली.
गेल्या 5 वर्षात शहरात झालेली विकासकामे आणि नेते मंडळींनी बदललेले पक्ष त्यामुळे यंदाची माढ्याची निवडणूक चुरशीची अन् रंगतदार होणार आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे ती पुढे जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती केली आहे. माढा नगरपंचायतीच्या प्रशासक म्हणून माढा विभागाच्या प्रांताधिकारी ज्योती कदम, मोहोळ नगरपरिषदेचे प्रशासक म्हणून पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी आणि माळशिरस नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून अकलूजचे उपविभागीय अधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत.
हेही वाचा - अकोला येथे 250 खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करा, अमित देशमुख यांचे आदेश
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : नोंदणीकृत नसलेल्या घरेलू कामगारांसाठी विशेष व्यवस्था करावी