पंढरपूर - राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर आता 24 फेब्रुवारी रोजीही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आदेश दिले आहे. द्वादशी दिवशी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून विठ्ठल मंदिर एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी दिली.
द्वादशीदिवशी मंदिर बंद
विठ्ठल मंदिर समितीकडून दोन दिवस मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र द्वादशीदिवशी मंदिर चालू केल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कोरोनाविषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विठ्ठल मंदिर बंदबाबत पुढील निर्णय उद्या
राज्यात कोरोनामारामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील काही मंदिरे ठराविक काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. यामुळेच बुधवारी विठ्ठल रुक्मिणी समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील काळासाठी मंदिर बंद ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
व्यापारपेठ राहणार सुरू
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर बुधवारी बंद राहणार आहे. मात्र पंढरपुरातील मुख्य बाजारपेठ सुरू राहणार आहे. तसेच पंढरपूरमध्ये येणाऱ्या खासगी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.