पंढरपूर(सोलापूर) - यंदा देखील वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठाची आषाढी वारी कोरोनाच्या संकटात अडकली आहे. त्यामुळे यंदाही वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन करता येणार नाही. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात कोरोनाचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने जवळपास 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची खबरदारीसाठी घेत अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना 'हेल्थकिट' चे वाटप केले आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम आदी उपस्थित होते.
पंढरपूर शहरात आठ दिवस तर तालुक्यात चार दिवसाचे संचारबंदी
पंढरपूर शहरात आषाढी काळात भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध घातले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आता पंढरपूर शहरात 18 जुलै ते 24 जुलै दरम्यान संचारबंदी लागू असणार आहे. यात पंढरपूर शहरातील प्रदक्षणा मार्ग आतील बाजूस, सर्व घाट वाळवंट परिसर, मंदिर परिसर तसेच गोपाळपूर येथे सात दिवसाची संचारबंदी असणार आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी, भटुंबरे, गादेगाव, चिंचोली भोसे, लक्ष्मी टाकळी, शेगाव दुमाला, कोर्टी, शिरढोण, कैठाळी या गावात 18 जुलै ते 22 जुलै दरम्यान संचारबंदी असणार आहे. या काळात कोणत्याही नागरिकाला घराबाहेर कामाशिवाय पडता येणार नाही. याठिकाणी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहे.
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा-
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्य शासनाकडून केवळ मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यंदाची वारी प्रतिकात्मक पद्धतीने साजरी होणार असल्याने पंढरपुरात प्रशासनाच्या वतीने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यातच यंदाच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीव जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 3 हजार पोलिसांचा फौज फाटा तैनात असेल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
पोलिसांच्या आरोग्याला प्राधान्य - झेंडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीवारीनिमित्त पंढरपुरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, प्रत्येक्ष बंदोबस्ताचे काम करताना पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपर पोलीस अधीक्षक झे़ंडे यांनी पोलिसांच्या आरोग्याला प्राधान्य देत खबरदारी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी जवळपास 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्थकिटचे वाटप केले आहे.
पोलिसांची बंदोबस्त काळात होणार कोरोना चाचणी-
वारी काळात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वारीला येणाऱ्या इतर कोणालाही कोरोनाची लागण होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी पंढरपूर शहर पोलीस ठाण्य़ातच पोलिसांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी 2 स्वंतत्र केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत 1600 पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात 4 जण कोरोनाबाधित असल्याची माहिती अधीक्षक झेंडे यांनी दिली.
कोरोना काळात झेंडे यांची उल्लेखनीय कामगिरी-
ग्रामीण पोलीस दलाचे अतिरिक्त अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कोरोना काळात ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. झेंडे यांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि लोकांच्या जीवास बाधा होऊ नये यासाठी शासनाने जनतेसाठी घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधाची कठोरपणे अंमलबजावणी केली. यासाठी त्यांनी जिल्ह्याच्या सीमांवर तपासणी नाके तैनात केले. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. या दृष्टीने ग्रामीण पोलीस दलाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात आल्या. ग्रामीण भागातील जनतेसाठी एकीकडे कडक निर्बंध लादले असताना, दुसरीकडे अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणे, शेतीच्या कामात अडथळा येणार नाही, याकडेही बारकाईने लक्ष देण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक झेंडे यांनी दिली.
पोलिसांसाठी कोरोना केअर सेंटरची सुरुवात-
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावर चौकाचौकात नाकाबंदी करून रात्रंदिवस एक करीत युद्धपातळीवर खबरदारीसाठी सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहेत. हे काम करीत असताना कित्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीसाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सोलापूर आणि पंढरपुरात कोविड मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. या माध्यमातून कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर औषधोपचार केले जात आहेत. तसेच, वरिष्ठांकडून दररोज तब्येतीविषयीची विचारणा केली जाते. यामाध्यमातून पोलिसांच्या आरोग्याचीही काळजी वरिष्ठांकडून घेतली जात असल्याचेही झेंडे यांनी यावेळी सांगितेल.