सोलापूर - पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज (रविवारी) हेरिटेज मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बिघाडी झाल्याचे दिसले. व्यासपीठाच्या फलकावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचा फोटो लावलेला नव्हता. यामुळे फोटो का लावला नाही, असे म्हणत शिंदे समर्थकांनी गोंधळ करत घोषणाबाजी केली. तसेच निदर्शने करत इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत वाद घातला.
आज सकाळी महाविकास आघाडीची बैठक हेरिटेज लॉन येथे आयोजित करण्यात आली होती. तब्बल दीड तास प्रमुख पाहुणे उशिरा आले. या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे व्यासपीठावर येताच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समोरच महिला शहर अध्यक्ष हेमा चिंचोळकर यांनी शिंदे यांचा फोटो का लावला नाही? अशी विचारणा करत निदर्शने करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळातच शिंदे समर्थक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे गोंधळ करू लागले. 'शिंदे साहेब तुम आगे बढो....', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यामुळे काही काळ बैठकीत तणाव दिसून आला.
हेही वाचा - 'विधानपरिषदेत शिक्षक हवेत, दलाल नको'; फडणवीसांची टीका
त्यानंतर माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, गटनेते चेतन नरोटे, आदींनी व्यासपीठावरून उठून शिंदे समर्थकांची मनधरणी केली.व त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी मिटिंग घ्यायची का मी इथून जाऊ? असा दम भरल्यानंतर शिंदे समर्थक नरमले.
बैठकीसाठी पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड जयंत असगावकर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आदी. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे समर्थकांना फोन -
गोंधळ करत असताना सुशील कुमार शिंदे यांनी तत्काळ फोन करून शांत राहण्याचे आवाहन केले. यानंतर शिंदे समर्थकांनी शांत बसून कार्यक्रमाला सहकार्य केले.