पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या नावाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र ही चर्चा निष्फळ असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारत नाना यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी पुढे केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राज्याचे युवा नेते आहेत. त्यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी ही अफवा आहे. पार्थ यांच्या उमेदवारीबाबत फिरत असलेली पोस्ट व प्रसारमाध्यमांमधून दिलेली बातमी खोटी असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत भगीरथ भालके यांच्याविरोधात चालवलेले हे कारस्थान आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
शरद पवार यांच्याकडून सस्पेन्स कायम
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या ताब्यात असलेल्या विठ्ठल साखर कारखान्याची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. पहिल्यांदा त्याला अडचणीतून बाहेर काढावे लागेल, असा सल्ला आज शरद पवार यांनी भालके यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यामुळे भगीरथ भालके यांच्या उमेदवारीवरून शरद पवार यांनी सस्पेन्स कायम ठेवला होता. विठ्ठल परिवाराकडून याबाबत अशी कोणतीही अधिकृत घोषणाही करण्यात आली. मात्र भारत भालकेंच्या रूपाने राष्ट्रवादीचा मतदारसंघावर पकड असणारा नेता हरपला आहे. भारत भालके त्यांच्या निधनामुळे भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट मतदारसंघात आहे. मात्र भगीरथ भालके यांना विठ्ठल कारखान्याचे चेअरमनपद देऊन शरद पवार यांनी तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केल्याचे म्हटले जात आहे.
विविध पक्षातील इच्छुकांच्या गावभेटी, लग्न समारंभावर जोर
आमदार भारत भालके हे कोणत्याही पक्षातून उभारले तरी मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठवले. पण, त्यांच्या अकाली निधनामुळे मतदारसंघात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढताना भालके यांच्याप्रमाणे मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे शिवसेनेच्या नेत्या शैलजा गोडसे याही सक्रीय झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातील गावभेटी, लग्नसमारंभ विविध कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावताना दिसत आहेत. यामुळे येणारी विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. याबाबतचे पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विठ्ठल परिवाराचा निर्णय ठरणार निर्णायक
माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील व वसंतराव काळे यांनी मिळून विठ्ठल परिवाराची स्थापना केली होती. विठ्ठल परिवाराच्या प्रमुख नेत्यांपैकी आमदार भारत भालके एक होते. विठ्ठल परिवाराच्या जोरावर आमदार भारत भालके यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमनपदी भगीरथ भालके यांची निवड करून विठ्ठल परिवार भालके कुटुंबासोबत असल्याचे जाणवून येत आहे. मात्र येणारी पंढरपूर विधानसभा निवडणूक कोण लढवणार, याबाबत अजूनही शंका निर्माण होत आहे.
लोकसभेत अपयश
२०१९च्या मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात चुरस वाढली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीने राजाराम पाटील यांना तिकीट दिल्याने ही निवडणूक तिरंगी ठरली होती. यात पार्थ यांचा पराभव झाला तर बारणेंनी गड राखला होता.