सोलापूर- महापालिकेच्या आयुक्तपदी दीपक तावरे हे रुजू झाले आहेत. दीपक तावरे यांनी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेऊन महापालिकेत आल्यावर आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. शहर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत असल्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतील कामांना गती देणे तसेच शहरातील करसंकलन आणि भांडवली निधीच्या विषयासह पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधनांचे अवघड काम तावरे यांना पार पाडावे लागणार आहे.
सोलापूरचे महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांची जिल्हाधिकारी पदावर बदली झाल्यानंतर दीपक तावरे यांची सोलापूर महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. दीपक तावरे हे पुणे येथे पणन मंडळात संचालक म्हणून काम करत होते. तावरे यांच्याकडे राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कांदा अनुदानाचा विषय असल्यामुळे तो विषय मार्गी लावून तावरे हे आज सोलापूर महापालिका आयुक्त पदावर रुजू झाले आहेत.
सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख या दोन देशमुखांच्या गटातील नगरसेवकांमध्ये प्रचंड वाद आहेत. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत असलेल्या देशमुखी गटांचा संघर्ष नेहमीच महापालिकेत पाहायला मिळतो. त्यातच भांडवली कामाच्या निधीवरून सत्ताधार्यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी आहे. तसेच सोलापूर महापालिका स्मार्ट शहरासाठी निवडली गेली आहे. त्यामुळे स्मार्ट शहर योजनेतील कामांना गती देणे, महापालिकेची स्थावर मालमत्ता असलेल्या गाड्यांची भाडेवाढ करून महापालिकेचे उत्पन्न वाढविणे, ही आव्हाने महापालिका आयुक्तांसमोर असणार आहेत.