सोलापूर - बोरामणी विमानतळासाठी अखेर निर्णय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत लवकरच या विमानतळाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लागणारी वनविभागाच्या जमिनीबाबत नागपूर येथे प्रस्ताव पाठवून मंजूर करून घ्यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. याशिवाय खासगी जमीन भूसंपादन व इतर बाबीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या दोन दिवसांत 50 कोटी रुपये विमानतळाच्या कामासाठी मिळणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. या विमानतळाविषयी आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात मंगळवारी (दि. 15 सप्टें.) बैठक आयोजित केली होती. या बैठकीस पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजय शिंंदे, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, वल्ला नायर, विमानतळ प्राधिकरणाचे दिपक कपूर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह अन्य अधिकारी व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर मधील बोरामणी (दक्षिण सोलापूर) येथे 2008 साली आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झाले होते. या विमानतळामुळे जगाच्या नकाशावर सोलापूरचे नाव झळकणार होते. यासाठी 550 हेक्टर जमीन भूसंपादन केली होती. तब्बल 1 हजार 375 एकर जमीन या विमानतळासाठी संपादित केली होती. 52 टक्के केंद्र शासन व 49 टक्के राज्य शासन अशा संयुक्त उपक्रमातून विकासकामाची जबाबदारी ठरली होती. राज्याच्या अर्थसंकल्पातून दरवर्षी 20 कोटी देण्याचे ठरले होते.
पण, गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम रखडले होते. अखेर प्रशासनाला या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची जाग आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तत्काळ बैठक बोलावून बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. या निर्णयामुळे सोलापूरकरांत आनंदाचे वातावरण वातावरण पहावयास मिळाले.
हेही वाचा - सोलापुरात माकपकडून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन