सोलापूर - येथील वडाळा ग्रामीण भागातील एका डॉक्टरवर पाळत ठेवून त्याचे अपहरण केले. डॉक्टराचे वडाळा ग्रामीण भागात पेट्रोल पंप देखील होते. त्याचे अपहरण करून 5 कोटी रक्कम मागावी असा उद्देश होता. मात्र दरोडेखोरांचा हा उद्देश उधळून लावण्यात आला आहे. फक्त 5 लाख 88 हजार रुपयांची रोकड हाताला लागली. दरोडेखोरांनी डॉक्टरला सोलापुरातुन पूणे येथे घेऊन गेले आणि मारहाण करून पुण्यातच सोडले. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास करत दरोडा घालणाऱ्या सात जणांच्या आंतरजिल्हा टोळीला चार दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ अनिल व्यंकटेश कुलकर्णी (वय 47,रा, उत्तर कसबा सोलापूर)असे अपहरण झालेल्या डॉक्टराचे नाव आहे.
मामाच्या मुलाने रेकी करून डॉक्टराचे अपहरण केले -
21 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास आपला वैद्यकीय व्यवसाय बंद करून तसेच स्वतः च्या मालकीचे पेट्रोल पंप बंद करून राहत्या घरी वेरणा कार मधून डॉ अनिल कुलकर्णी निघाले होते. त्यावेळी दरोडेखोरांनी इनोव्हा कार मध्ये येऊन डॉ अनिल कुलकर्णी यांची कार अडवून मारहाण केली आणि वेरणा कार मधून बाहेर काढून इनोव्हा कार मध्ये बसवले. मोहोळ, पंढरपूर, टेम्भुर्णी, इंदापूर, बारामती, जेजुरी, सासवड मार्गे वारजे माळवाडी पुणे येथे नेऊन पेट्रोल पंपाची सर्व रक्कम अशी 5 लाख 88 हजारांची रोखड जबरदस्तीने काढून घेतली. पण यासाठी सराईत दरोडेखोरांमधील एका नातलगाचा वापर केला. हा नातेवाईक सोलापुरातील वडाळा येथे राहावयास होता. म्हणजेच मामाचा मुलगा यास रेकी करण्यास या दरोडेखोरांनी सांगितले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी या दरोड्यातील सात जणांना अटक केली आहे. विकास सुभाष बनसोडे (वय 31 वर्ष, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे), सिद्धार्थ उत्तम सोनवणे (वय 42,रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे), रोहित राजू वैराळ (वय 28 वर्ष, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे), रामचंद्र बालाजी कांबळे (वय 21 वर्ष, रा. साईधाम, ता हवेली, जि पुणे), वैभव प्रवीण कांबळे (वय 21 वर्ष, रा, जवळा खुर्द, ता कळम्ब, जि उस्मानाबाद), भारत दत्तात्रय गायकवाड (वय 31 वर्ष, वडाळा, ता उत्तर सोलापूर), मुराद हनिफ शेख (वय31 वर्ष, रा. वडाळा ता उत्तर सोलापूर, जि सोलापूर) यांना अटक केली आहे. यामध्ये भारत गायकवाड हा संशयित आरोपी विकास बनसोडे याचा नातलग म्हणजे मामेभाऊ आहे. विकास बनसोडे याने भारत गायकवाड यास रेखी करण्यास सांगितले होते, याने रेकी करून डॉ अनिल कुलकर्णी यांची निवड करून अपहरण करून एक कोटीची रक्कम उकळण्याचा प्लॅन केला होता.
एक कोटीची मागणी -
सातही दरोडेखोरांनी 21 सप्टेंबर 2021 रोजी रात्री डॉ. अनिल कुलकर्णी यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करत पुण्याला घेऊन गेले. पाच कोटींची रक्कम मागू लागले होते. पण डॉ. अनिल कुलकर्णी यांच्याकडे तेवढी रक्कम नसल्याची जाणीव झाली. डॉक्टरच्या घराच्यांना फोन करून एक कोटींची रक्कम मागितली होती. पण ती देखील रक्कम मिळणे अवघड वाटू लागल्याने शेवटी त्यांनी डॉक्टर कडे उपलब्ध रक्कम 5 लाख 88 हजार 420 रुपये घेतली. आणि पुणे येथे वारजे माळेवाडी येथे गाडीतून ढकलून देऊन पसार झाले.
असा लागला दरोडेखोरांचा तपास -
सोलापुरातील ग्रामीण भागातील नागरीक व व्यवसायिक या घटनेमुळे भयभीत झाले होते. याची गंभीर दखल घेत ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेला याचा तपास देण्यात आला. यामधील तपास अधिकारी एपीआय रवींद्र मांजरे यांनी कसून तपास करत, पाच संशयित इसमांना ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवल्या त्यामधील विकास बनसोडे याने माहिती देत हकीकत सांगितली. मामाचे गाव सोलापूर असून मामाच्या पोरानं रेखी केली आणि पाच कोटी किंवा एक कोटी इतकी रक्कम खंडणी मधून मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र फक्त 5 लाख 88 हजार रुपये हाती लागले. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सोलापुर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथून भारत गायकवाड आणि मुराद शेख यांना ताब्यात घेतले.
2 लाख 50 हजार रुपयांची रोखड जप्त केली -
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित दरोडेखोरांकडून 2 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम ,गुन्ह्यात वापरलेली एक इनोव्हा कार(एम एच 42 -4554),एक दुचाकी वाहन, सात मोबाईल असा एकूण 8 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यास एपीआय रवींद्र मांजरे, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, समीर शेख, अक्षय दळवी आदींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.