सोलापूर - पंढरपुरात सकाळपासून दमदार पाऊस झाला. पावसामुळे महदाबाद वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्याला पूर आला. प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुण अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली.
मागील महिन्यापासून सुरू असलेल्या म्हैसाळच्या पाण्याने या परिसरातील बंधारे तुडुंब भरले. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाल्यामुळे हे ओढे भरून वाहू लागले. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी हा तरुण सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पाण्यात मासे पकडण्यासाठी गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो वाहून गेला. उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करून शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळच्या दरम्यान शोधकार्य करण्यास अडथळा येत असल्यामुळे शोध कार्यासाठी रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले आहे.