सोलापूर - लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ८३ सहाय्यकारी मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतची माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यकारी मतदान केंद्रासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली. सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, तहसीलदार श्रीकांत पाटील, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले, जिल्ह्यातील वाढलेल्या मतदारांची संख्या लक्षात घेता एकूण 83 सहाय्यकारी मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. या केंद्रांना मंजुरीसाठी प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
प्रस्तावास मंजुरी मिळताच राजकीय पक्षांना सहाय्यकारी मतदान केंद्राबाबत माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन राजकीय पक्षांना केले.