सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात पुन्हा एकदा पंधरा दिवसांचे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, संचारबंदीचा निर्णय तूर्त घेतला जाणार नाही, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते गुरुवारी सकाळी सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहरात एक लाख व ग्रामीण भागात पन्नास हजार रॅपिड टेस्ट घेण्यासठी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
आज सकाळी पालकमंत्री भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद सीईओ प्रकाश वायचळ आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी कोरोना संकटाचा सामना कसा करायचा यावर चर्चा करण्यात आली. बैठकीत असलेल्या अधिकाऱ्यांनी रॅपिड टेस्ट घेण्यावर भर दिला. संसर्ग कमी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई आदी विषयावर बैठकीत चर्चा संपन्न झाली.
मनपा आयुक्त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पुन्हा एकदा संचारबंदी लावण्याबाबत प्रस्ताव ठेवला होता. यामुळे नागरिकांत अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झाले होते. अनेक नागरिकांनी किराणा माल भरण्यास सुरुवात केली होती. नागरिकांच्या मनात संचारबंदीची धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन पुन्हा संचारबंदी लावण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अधिकाऱ्यांशी चर्चा करुन संचारबंदीचा निर्णय घेण्यात येईल, असे भरणे यांनी सांगितले.