सोलापूर - सगळ्या परंपरेतील ओव्यांकडे पाहिले तर अशिक्षित महिलांनी सामाजिक स्वातंत्र्य नसतानाही, आपल्या आयुष्याचे सार ओव्यातून मांडले. या ओव्या उत्तम कविता आहेत. मी स्त्री जीवनांविषयी आस्था ठेवून लिहीत गेले. यामुळे आज स्वर्गीय दत्ता हलसगीकर यांच्या नावे मिळालेला पुरस्कार माझ्या पुढील कार्याचा सन्मान आहे, अशी भावना जेष्ठ कवयित्री आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली. ते रविवारी सोलापूरात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसीजन फाउंडेशनच्यावतीने यंदाचा स्वर्गीय कवी दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक, राज्यस्तरीय पुरस्कार उल्हास दादा पवार यांच्या हस्ते कवयित्री अरुणा ढेरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कवियत्री ढेरे बोलत होत्या. सोलापूरात हिराचंद नेमचंद सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे हे अध्यक्षस्थानी होते.
सत्कार सोहळ्यापूर्वी कवियत्री अरुणा ढेरे आणि स्वर्गीय दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचे वाचन प्रकाश पायगुडे आणि सायली जोशी यांनी केले. यावेळी हलसगीकर यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या ब्लॉगचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच निवडक दिवाळी अंकाचा गौरवही यावेळी करण्यात आला.