सोलापूर - बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सुनील ऊर्फ किशोर काळे यांना पुलवामातील बंदजू परिसरात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले आहे. सुनील काळे हे त्यांचे कागदोपत्री नाव असले तरी त्यांना सर्वजण किशोर या नावानेच ओळखतात.
सुनील काळे हे बार्शी तालूक्यातील पानगावचे रहिवसी आहेत. काळे यांचे शिक्षण पानगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेले आहे. पानगाव हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुनील काळे हे सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले असून त्यांचे कुटूंब हे दिल्ली येथे वास्तव्यास आहे.
आतापर्यंत पानगावातील चार जवांनाना वीरमरण आले आहे. 1965च्या युद्धात देखील जवान अभिमन्यू पवार यांना वीरमरण आले होते. सुनील ऊर्फ किशोर काळे हे पानगावातील चौथे शहीद आहेत, ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन अतिरेक्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. यावेळी काळे यांना वीरमरण आले आहे. या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.
'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहिम सुरू केली होती. जेव्हा जवानांनी संशयित परिसराला वेढा घातला. तेव्हा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यावर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर काळे यांना या चकमकीत वीरमरण आले आहे..
हेही वाचा - J-K : पुलवामा चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवानाला वीरमरण