पंढरपूर - वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाची आषाढी वारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारी प्रतिनिधिक स्वरूपाची होणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात नऊ दिवसांची संचारबंदीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी आज पंधरा दिवसांच्या योगिनी एकादशी निमित्ताने पंढरपुरमध्ये एकच गर्दी केली होती. पहाटेपासूनच चंद्रभागा-वाळवंटेमध्ये भाविकांनी स्नान करत विठुरायाच्या कळसाचे आणि नामदेव पायरीचे दर्शन घेऊन समाधान मानले आहे. तसेच, विठ्ठल मंदिर परिसरातील प्रदक्षिणा पूर्ण करत भाविकांनी आपल्या घराकडे फिरणे पसंत केले आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी नामदेव पायरीचे दर्शन घेत प्रसादिक वस्तूंची खरेदी केली आहे.
चंद्रभागेत भाविकांची गर्दी
गेल्या दोन वर्षांपासून आषाढी एकादशी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे आषाढी वारी दरम्यान, कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनीही आज योगिनी एकादशी निमित्ताने चंद्रभागेत स्नान करत विठुरायाच्या कळसाचे दर्शन घेतले. त्यानंतर नामदेव पायरी दर्शन घेऊन प्रदक्षिणा फेरी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे भाविकांना विठुरायाच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागले. तसेच, आषाढी वारी कोरोनामुक्त होऊ दे असे साकडेही भाविकांनी आपल्या लाडक्या विठ्ठलाकडे घातले आहे.
पंढरीत नऊ दिवसाची संचारबंदी
कोरोना संसर्गामुळे आषाढी वारी सोहळा प्रशासनाकडून साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडणार आहे. त्यामुळे पंढरी 17 जुलै ते 25 जुलै या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यावेळी पंढरपूर व आसपासच्या गावांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पंढरीत मानाच्या दहा पालख्यांना प्रवेश दिला जाणार आहे. इतर कोणत्याही वारकरी व भाविकांना आषाढी यात्रा काळात पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीयवर नाका-बंदीचे आयोजन करण्यात आले आहे.
संचार बंदीच्या काळात बससेवा सुरू
आषाढी वारीच्या आदल्या दिवशी मानाच्या दहा पालख्यांना एसटी बसच्या माध्यमातून वाखरी येथील पालखी स्थळावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर वाखरी ते विसावा अशी सहा किलोमीटर पायी दिंडी चालवण्याची परवानगी राज्यशासनाकडून चारशे वारकरी भाविकांना दिली आहे. संचार बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक पंढरपूर तालुक्यातील बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व खाजगी वाहतूक ही इतर मार्गाने वळवण्यात येणार आहे. दरम्यान, बससेवा मात्र, चालू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.