सोलापूर - सोलापूर शहरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदर कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू असल्याचे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिंलिंद शंभरकर यांनी सांगितले. सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर 10 टक्क्यापर्यंत गेला होता. कोरोनाचा हा वाढलेला मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांनी शासकीय रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी यावेळी चर्चा केली.
सोलापूर शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर हा जास्त आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 127 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 हजार 650 जणांचा कोरोनाची बाधा झालेली आहे. यातील 781 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. सोलापुरातील कोरोना विषाणूमुळे बाधा होऊन होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर आणि वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी व्यापक चर्चा केली.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल (दि. 12 जून) आढावा बैठकीत मृत्यूदर कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज शंभरकर यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी सहाय्यक संचालक डॉ. धनराज पांडे, कोरोना विभाग प्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. औंदुबर मस्के, डॉ. राजेश चौगुले, डॉ.रामेश्वर डावकर आदी उपस्थित होते.
सोलापुरातील कोरोनाचा वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याच्या सूचना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या होत्या. पालकमंत्री यांच्या सूचनेनूसार मृत्यूदर कमी करण्यासाठी आणखी काय करता येईल, यावर चर्चा झाली. त्यामध्ये कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटांची क्षमता वाढवता येते का, यावर चर्चा झाली. महाविद्यालयातील बी ब्लॉकमधील काही बेड कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरता येतील का, या शक्यतेवर विचार झाला.
जिल्हा शासकीय रूग्णालयातील 100 खाटांची व्यवस्था ही कोरोनासाठी करण्यात आली होती. मात्र, सोलापुरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेल्वेचे रुग्णालय, ईएसआय रुग्णालय या ठिकाणी देखील रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आणखी खाट वाढविण्याची गरज आहे. सोलापुरातील खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नकारात्मकता दाखविलेली आहे. अशा परिस्थितीत सोलापुरातील शासकीय रुग्णालयातच आणखी काही खाटांची संख्या वाढविता येतील का, यावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
हेही वाचा - सोलापुरात 42 कोरोनाग्रस्तांची वाढ, तिघांचा मृत्यू