सोलापूर - कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यापासून सुरू झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्र राज्यात ऑक्सिजनची योग्य व्यवस्था करणे अपेक्षित होते. तसेच रुग्णांना मुबलक प्रमाणात बेडची व्यवस्था करणे गरजेचे होते. असे न करता लसीकरणाचे भांडवल करत, महाराष्ट्र राज्यात कोविड हत्याकांड घडवले, अशी सडकून टीका करत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
शनिवारी माजी खासदार किरीट सोमैया हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी एका खाजगी हॉस्पिटलला भेट देऊन सोलापूर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांसमोर राज्य सरकारवर टीका केली. एप्रिल महिन्यात राज्यात भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याला सर्वस्वी जबाबदार ठाकरे सरकार असल्याचे सांगितले.
एप्रिल महिन्यात जे मृत्यूकांड झाले आहेत, त्याचा लसीशी काहीही संबंध नाही. असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. तसेच येत्या काळात भाजप कोविड मृत्यूंचे स्पेशल ऑडिट करणार आहे. महाराष्ट्रातील 13 महत्वाच्या शहरात हे ऑडिट केले जाणार आहे. यासाठी दोन सीए भाजपकडून नियुक्त केले जाणार आहेत.
दिशाभूल करण्यासाठी लसीकरणाचे नाटक -
उद्धव ठाकरे लसीसाठी 13 एप्रिलला जागे झाले आणि त्यावेळी लसीकरण झाले असते तर मृत्यू थांबले असते का?असा सवाल किरीट सोमैया यांनी उपस्थित केला. कोरोना मृत्यूला सर्वस्वी जबाबदार उद्धव ठाकरे आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे सरकारवर करण्यात आली. जनतेची दिशाभूल करण्यासाठी लसीकरणाचे नाटक केले जात आहे. 5 मार्चपासून कोरोना रुग्ण वाढू लागले त्यावेळी काय हवं होतं ते उद्धव ठाकरे सरकारने केलं नाही असेही किरीट सोमैया म्हणाले.
सचिन वाझे प्रकरणात आता जितेंद्र आव्हाड सापडतील -
राज्यभर गाजलेल्या मन्सुख हिरेन हत्याकांड प्रकरणात अनेक जण सापडले आहेत. आता पुढे जितेंद्र आव्हाड सापडतील, अशी माहिती किरीट सोमैया यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना सांगितली.