सोलापूर- सोलापूरमध्ये कोरोना लसीकरनाचे ड्राय रन पार पडले. महापालिकेच्या दाराशा आरोग्य केंद्रात हे ड्राय रन घेण्यात आले. यावेळी काही आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले, तसेच लसीकरण करताना घ्यावयाची काळजी याबाबत रंगीत तालीम देखील पार पडली.
कोरोना लसीच्या ड्राय रनचा शासनाकडून आदेश मिळताच सोलापूरच्या दाराशा रुग्णालयामध्ये शुक्रवारी ड्राय रन घेण्यात आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ड्राय रन आयोजीत करण्यात आले होते. या ड्राय रनचे उद्घाटन मनपा उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
आशा वर्कस आणि नर्सचे लसीकरण
जिल्ह्यात एकूण तीन ठिकाणी ड्राय रन पार पडले, त्यातील दाराशा येथील रुग्णालयात पार पडलेल्या ड्राय रनदरम्यान एकूण 25 जणांना लस देण्यात आली. त्यामध्ये आशा वर्कस आणि नर्स यांचा समावेश होता. दरम्यान लसीकरणासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्तांनी दिली.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस
मनपाच्या 15 नागरी आरोग्य केंद्रातून व शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयातून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. एका सत्रात 100 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. एका सत्रासाठी 5 सदस्यांचे पथक कार्यरत असणार आहे. सर्वप्रथम सरकारी तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यानंतर शासनाच्या विविध विभागातील फ्रंट लाईन वर्कर यांचे व त्यानंतर 50 वर्षांवरील व्यक्तीचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.