मुंबई- जगभरात प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने मुंबईला आपले हॉटस्पॉट बनवले होते. ५ महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यास मुंबई महापालिकेला यश येत आहे. कोरोना रुग्ण दुपटीचा २४ दिवसांपूर्वी ७६ टक्के असलेला कालावधी आता ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर हा ७६ टक्क्यांवरून ८१ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत रोज एक हजाराच्या घरात रुग्ण आढळत असले तरी कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही १०० ते १५० च असते, इतर लक्षणे नसलेले रुग्ण असतात. कोरोना कोविड सेंटर, पालिकेसह खाजगी रुग्णालयात उपलब्ध केलेल्या खाटांमुळे कोरोनाबाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होत आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने पालिकेसह कोरोना कोविड सेंटरमधील खाटा रिक्त पडल्या आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाचा कोरोना विरोधातील लढा यशस्वी होत असल्याने रुग्ण दुपट्टीचा कालावधी वाढत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
असा वाढला कालावधी-
३१ जुलैला रुग्ण दुपटीचा कालावधी ७६ दिवसांवर पोहोचला होता. गेल्या २४ दिवसात त्यात वाढ होऊन रुग्ण दुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर पोहोचला आहे. तर, ३१ जुलैला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के होते. त्यातही वाढ होऊन हा दर ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ दिवसात चाचण्यांचे प्रमाण २ लाखांनी वाढले असून ३१ जुलैपर्यंत ५ लाख २६ हजार ९८२ चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात वाढ होऊन २४ ऑगस्टपर्यंत ७ लाख ९ हजार ५८३ चाचण्या करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत इतके रुग्ण-
मुंबईत काल सोमवारी २४ ऑगस्टला कोरोनाचे ७४३ नवे रुग्ण आढळून आले असून २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ३७ हजार ९१ वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा ७ हजार ४३९ वर पोहोचला आहे. सध्या मुंबईत १८ हजार २६३ सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा- आमच्या कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी द्या - व्यापारी संघटना