सोलापूर - दरवर्षीप्रमाणे यंदा ही हज यात्रा सौदी अरेबिया देशात संपन्न होत आहे. पंरतु, या हज यात्रेवर कोरोना महामारीचे संकट आले आहे. भारतातील 2 लाख 5 हजार भाविक हज यात्रेपासून वंचित राहिले आहेत. सौदी सरकारने बाहेरील एकाही व्यक्तीला यंदा प्रवेश दिला गेला नाही. फक्त 10 हजार स्थानिक नागरिकांच्या उपस्थिती मध्ये हज पूर्ण केला जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत 'काबा'च्या चोहो बाजूनी (तावाफ)फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतातून 2 लाख 5 हजार, यात महाराष्ट्र राज्यातून 12 हजार तर सोलापूर शहरातून 700 भाविक हज यात्रेला मक्का येथे न जाता बकरी सण (ईद उल अझहा) घरीच साजरा करत आहेत.
दरवर्षी भारतातून 2 लाख 5 हजार भाविक बकरी सण(ईद उल अझहा) साठी सौदी अरेबिया येथील मक्का शहर येथे जातात. तर महाराष्ट्र राज्यातुन 12 हजार व सोलापूरातुन 700 भाविक हज यात्रेला जातात. पण कोरोना संकटाने भारतातील व सोलापूरातील भाविकांना ही यात्रा रद्द करावी लागली आहे. हज यात्रेला जाण्यासाठी हज कमिटी ऑफ इंडिया हे कामकाज पाहते. एका व्यक्तीला वर्गवारी नुसार 2 लाख 90 हजार तर 2 लाख 40 हजार रुपये असा खर्च येतो. ही सर्व रक्कम कमिटी ने भाविकांना परत दिली आहे.
हेही वाचा - राम मंदिर भूमीपूजन उत्सवासाठी अयोध्येतील मंदिरात 'दीपोत्सव'
दरवर्षी हज यात्रेसाठी मक्का येथे विविध देशातून 25 लाख भाविक दाखल होतात. या हज यात्रेमधून अरबो रुपयांची उलाढाल होते. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला देखील मोठा फायदा होतो. परंतु, यंदा या महामारीमुळे हवाईसेवा देखील ठप्प झाली आहे. सौदी अरेबिया सरकारने फक्त स्थनिक लोकांना हज यात्रा करण्यास परवानगी दिली. जवळपास 10 हजार भाविक हज मधील धार्मिक विधी संपन्न करत आहेत.
हज यात्रेचा इतिहास...
दरवर्षी हज यात्रा ही इस्लामिक कॅलेंडरमधील 12 व्या महिन्यात 8 व्या दिवसापासून ते 13 व्या दिवसापर्यंत हज यात्रा संपन्न होते. इस्लाम धर्मातील पैगंम्बर इब्राहिम यांनी त्यांची पत्नी हाजरा यांना फलस्तीन देशातून अरब देशात येण्यास सांगितले होते. त्यांसोबत त्यांचे पुत्र इस्माईल हे देखील बाल्यावस्थेत होते. कडक उन्हात व वाळवंट मध्ये त्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. इस्माईल यांना तहान लागली होती, पण पाणी नव्हते. आपल्या मुलाची तहान भागवण्यासाठी पाण्यासाठी सफा व मरवा या दोन पर्वतांमध्ये आई हाजरा यांनी धावपळ केली होती. त्यांनी देवाकडे पाण्यासाठी प्रार्थना करून विनवणी केली असता, त्या ठिकाणी पाण्याचा झरा लागला होता.
त्यानंतर पैगंम्बर इब्राहिम आले, त्यांनी हे पाहून आश्चर्य व्यक्त करत देवाचे(अल्लाह) आभार मानले. त्यांच्या पुत्र इस्माईल व इब्राहिम यांनी मक्का येथील काबा या इमारतीचे बांधकाम केले आणि त्याची प्रार्थना सुरू केली. कालांतराने ही प्रथा कमी होत गेली आणि त्या ठिकाणी मूर्तिपूजा सुरू झाली. मोहम्मद पैगंम्बर यांचा काळ सुरू झाला. त्यांनी मदिना या शहरातून मक्का येथे इ. स. 628 ला पहिली हज यात्रा केली. त्याकाळी त्यासोबत 1400 अनुयायी होते आणि मक्का येथील मूर्तिपूजेला तीव्र विरोध करत ईश्वर(अल्लाह) एक आहे. असा संदेश देत इस्लाम धर्माचा प्रसार केला. त्या काळापासून आजतागायत दरवर्षी हज यात्रा संपन्न होते.
इतिहासामध्ये पहिल्यांदाच बाहेर देशातील लोकांना परवानगी नाकारली आहे. अनेक श्रद्धाळू जगभरातून हज यात्रेसाठी मक्का येथे हज यात्रेसाठी जातात. हज यात्रेमध्ये असताना प्रमुख चार ठिकाणी विधी करावे लागतात. मक्का, मीना, अरफात, मुजदलफा या ठिकाणी हज यात्रेचे विधी संपन्न होतात. हज यात्रेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे तन, मन आणि आत्मा शांती होय.
हेही वाचा - 'राज्याची गाडी एक, मात्र स्टेअरिंग दोघांच्या हाती, कुठंपर्यंत जाईल माहिती नाही'
2009 साली स्वाइन फ्लूचे सावट...
स्वाइन फ्लू या महामारी ने देखील जगभरातील नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य केले होते. त्यावेळी देखील हज यात्रेवर स्वाइन फ्लूचे सावट आले होते. सौदी सरकारने हज यात्रेमधील हाजी भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक केले होते. आता जी परिस्थिती आहे, त्यावेळी मात्र अशी परिस्थिती नव्हती. मक्का येथे बाहेरील लाखो भाविक दाखल झाले होते. पण, यंदा कोरोना महामारीमुळे सौदी सरकारने देशाबाहेरील नागरिकांना मक्का येथे प्रवेश बंदी घातली आहे.
इतिहासात पहिल्यांदाच बाहेरील लोकांना प्रवेशबंदी...
इ.स. 628 पासून आजतागायत कधीच हज यात्रेकरूना प्रवेश बंदी करण्यात आली नव्हती. कोरोना महामारीमुळे सौदी अरेबिया सरकारने इतिहासात पहिल्यांदाच एकाही बाहेरील नागरिकास हजला प्रवेश दिला नाही. 25 लाख भाविक एकाच वेळी हज यात्रा करतात. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंचे पालन होत नाही. अतिशय दाटी वाटीने हज यात्रेत भाविक धारमिक विधी पूर्ण करतात. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याचे असल्यास फिजिकल डिस्टन्सिं राखणे गरजेचे आहे. खबरदारी म्हणून सौदी सरकारने बाहेरील लोकांना प्रवेश बंदी केली आहे. फक्त सौदी मधील देखील काही मोजक्या भाविकांना प्रवेश दिला आहे.