पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान झाले. मतदारसंघात अकरा दिवसामध्ये प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांकडून मोठ्या सभा घेण्यात आल्या. त्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पोटनिवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. रविवारी सुमारे सव्वादोनशे कोरोना रुग्ण आढळले आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढणार आहे.
लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घेण्याचे आव्हान -
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांकडून मोठ्या सभा घेण्यात आल्या. त्यावेळी कोणत्याही प्रकारचे कोरोना नियमांचे पालन होताना दिसले नाही. त्यात मास्क न घालणे, सुरक्षीत अंतर न ठेवणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, यामुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क वाढला. त्यामुळे कोरोनाचे लक्षण नागरिकांना आढळून आल्यास तत्काळ तज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
तीन दिवसात दहा जणांचा मृत्यू-
पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात तीन दिवसांमध्ये सुमारे 700 कोरोना रुग्ण आढळले. त्यात दहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यात 1291 रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर मंगळवेढा तालुक्यात 590 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.